शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला

Photo by Jorge Bermudez on Unsplash

————————————————

शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला
सूर्यकिरणांनी झेप घेतली जिथे
दिव्यांनी अंधार उजळवला जिथे
वाऱ्याने फेरफटका मारला जिथे
पक्षांनी किलबिलाट केला जिथे

शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला
क्षितिजाच्या पलीकडे वसलेल्या गावी
गर्दीने गजबजून गेलेल्या शहरी
शेकडो कुटुंब राहणाऱ्या गल्ली
ऐश्वर्याने नटून गेलेल्या महाली

शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला
स्वरांनी नटलेल्या संगीत मैफिलीत
ढोल-ताशा वाजणाऱ्या मिरवणुकीत
परंपरागत साजऱ्या होणाऱ्या उत्सवात
पावित्र्य नांदणाऱ्या अगणित मंदिरात

शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला
पंडित, ऋषींच्या मांडीयाळीत
कलाकारांच्या उत्स्फूर्त कलेत
वैज्ञानिकांच्या युरेका क्षणात
साधकांच्या कठोर तपश्चर्येत

शोधले त्या प्रत्येक दिशेस तुला
आनंदाने आयुष्याला खुलवले जिथे
स्पंदनांनी हृदयाला बिलगले जिथे
श्वासांनी निश्वास टाकला जिथे
नवजीवनाची कळी उमळली जिथे

———————————————

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via