बांधले मी मनाचे मनोरे असे

कानोसा घेत पावलांचा तुझ्या
कळी मनात मिलनाची खुले
तू येताच समोर माझे डोळे
पुनवेचा चंद्रही फिका पडे
बांधले मी मनाचे मनोरे असे

आभास तुझा वेडापीसा करे
सहवास तुझा करेल काय माझे
बोलायचे काहीतरी ठरवून येतो पण
समोर तुझ्या शब्द विरघळतात कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे

कधी वाटे तुझ्यासोबत काही न बोलावे
एकमेका पाहत फक्त स्मितहास्य करावे
स्मितहास्य करताच तू विचार करतो
साठवून हे क्षण पेटाऱ्यात ठेवावे कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे

असतो मी कोण वेगळाच तुझ्यासमोर
दब्या भावनांचे व्यक्त होणे असेल ते
वा कदाचित होत असेल असेच या धुंदीत
आगळ्या या वागण्याचे समर्थन करावे कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे

धैर्य सारे एकवटून डोळ्यांत तुझ्या पाहावे
अधीर होऊन मनातले सारे बोलून टाकावे
पण नकळत झालेल्या या मनाच्या चोरीचे
आळ तुझ्यावर मी घ्यावे कसे
बांधले मी मनाचे मनोरे असे

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via