पडतात आजही स्वप्नं मला

पडतात आजही स्वप्नं मला
जगायच्या राहून गेलेल्या अनेक क्षणांची
अतिविचाराने उद्भवणाऱ्या परिस्थितींची
विचारायच्या राहून गेलेल्या प्रश्नांची
भूतकाळात वर्तविलेल्या चुकीच्या भाकीतांची

पडतात आजही स्वप्नं मला
फेटाळलेल्या, दुर्लक्षित केलेल्या सत्याची
भीतीपोटी टाळलेल्या अगणित कृतींची
लोकांचा विचार करून घेतलेल्या निर्णयांची
खोलवर दाबून ठेवलेल्या भावनांची

पडतात आजही स्वप्नं मला
आई-वडिलांच्या अपूर्ण ठेवलेल्या अपेक्षांची
मनातून उतरलेल्या त्या धोकेबाज दोस्तीची
प्रेमात ठोकर खाल्लेल्या दीनवाण्या काळजाची
अपमानापुढे विरघळून गेलेल्या स्वाभिमानाची

पडतात आजही स्वप्नं मला
लढण्याआधी हार मानलेल्या लढायांची
स्वत:पुढे न कबूल केलेल्या पापांची
एक खोटे लपवण्यास बोललेल्या शंभर खोट्यांची
योग्य वेळेची वाट पाहण्यात घालवलेल्या वेळेची

पडतात आजही स्वप्नं मला
फुटक्या नशिबापुढे पसरलेल्या हातांची
कर्तृत्वहीनतेपुढे लाचार झालेल्या बळाची
वेळ निघून गेल्यावर प्राप्त झालेल्या ज्ञानाची
जबाबदारीच्या नावाखाली आहुती दिलेल्या स्वप्नांची

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via