राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक

Photo by Farrinni on Unsplash

—————————————-

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात चोरून मिळवावी नजर एकमेकांशी
त्या दोघांनाच कळावा त्या नजरेचा अर्थ
अलगद फुलावे ओठांतून स्मितहास्य
अन् हसूनच सांगावे कबुल आहे प्रेम

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात एकमेका भेटायचे शोधावे कारण
मोठा साचा घेऊन भेटी ठेवाव्या त्यात
काढाव्या बाहेर त्या एखाद्या वेळी
सुंदर ते क्षण पुन्हा जगावे विरंगुळयात

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात कधी संपू नये मिलनाची ओढ
कधी मोजू नये सहवासाची ती वेळ
रूसावे उगाच, कधी बसावे फुगून
समजुतीच्या बहाण्याने देत राहावे प्रेम

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात न कळावी दिशा, न ठिकाणा
फिरत राहावे, भटकत राहावे धरून हात
भिजत भिजत एकमेकांच्या सहवासात
क्षणोक्षणी अनुभवावा प्रेमाचा पाऊस

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात न असावे वास्तवाचे भान
न पाळावे समाजाचे कोणते बंधन
पूर्णवेळ होऊन प्रेमात उन्मत्त
स्वैराचाराचे जगणे बसावे कवटाळून

राहून गेली जगायची प्रेमकहाणी एक
ज्यात नसावे भय कहाणी पूर्णत्वास नेण्याचे
आठवणींचा सडा तेवढा घ्यावा पाडून पदरात
करताना प्रेम हातचे काही न राखावे
वाऱ्याप्रमाणे एकमेकांना फक्त झोकून द्यावे

—————————————-

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via