
Photo by Jake Heidecker on Unsplash
——————————————–
भेटलीस जरी तू इतक्या वर्षांनी
होते ते तुझेच रूप, तुझे रंग तरीही
अनोळखी व्यक्ती पाहिल्यासारखा
स्त:ब्ध बघत राहिलो मी कसा
जगलो कसा तुझ्याशिवाय
अवगत नाही माझे मला
डोळ्यांत पाहताच तुझ्या
तक्रारी विसरलो मी कसा
जमवून ठेवले होते काळजात
महासागराच्या थेंबांइतके शब्द
जाब विचारायच्या वेळी नेमका
निःशब्द असा राहिलो मी कसा
नाही पडत पचनी कलियुगाचे गणित
ज्यात बदलतात प्रेमी नशा उतरल्यावर
तुझ्यासाठी सात जन्मीचे नाते आणूनही
सांग कुठे कमी पडलो मी कसा
भावनांच्या परडीतील सारी फुले
आजवर ठेवली तुझ्यासाठी राखून
पण हृदयी तुझ्या पाषाण पाहून
क्षणात कोमेजून गेलो मी कसा
——————————————–
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा