कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर

Photo by The Phope on Unsplash

——————————————–

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
आकाशात ढगांचे जितके आकार आहेत
सूर्याच्या किरणांमध्ये जेवढे कण आहेत
लुकलुकत्या ताऱ्यांमध्ये जितका प्रकाश आहे
चंद्रकोरीवर जेवढ्या नजरा खिळत आहेत तेवढं

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
अथांग समुद्रात जितके पाण्याचे थेंब आहेत
इंद्रधनूच्या सप्तरंगात जितक्या छटा आहेत
हिमाच्छादित डोंगरात जितके हिमकण आहेत
झुळुकेने झाडांची जेवढी पाने हलत आहेत तेवढं

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
संगीतमैफिलीत जेवढा स्वरसांज मांडला जातो
आरतीवेळी घंटेतून जेवढा नाद बाहेर पडतो
मिरवणुकीतील वाद्यांनी जेवढा झंकार येतो
पक्ष्यांच्या किलबिलाटातून जेवढी आर्तता येते तेवढं

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
डोंगरमाथ्यावरून सृष्टीचे जेवढे सौंदर्य दिसते
संध्याकाळची रात्र होताना जेवढे नजारे बदलतात
रात्रीचा दिवस होताना जेवढ्या आशा जागतात
क्षितिजापलीकडेही जेवढा आसमंत आहे तेवढं

कसं सांगू किती प्रेम करतो मी तुझ्यावर
पाहताक्षणी तुला डोळ्यांत जेवढे सामावून घेतले
नसांतल्या रक्तथेंबांनी जितक्या वेळा तुझे नाव घेतले
हृदय जितक्या वेळी फक्त तुझ्यासाठी धडधडले
हयातीत फक्त तुझ्यासाठी जेवढे श्वास घेतले तेवढं

——————————————–

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via