
————————————————————–
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
ती चूक पुन्हा करायची नाही अशी
मनाशी गाठ बांधली असतानासुद्धा
कळतय पण वळत नाही म्हणून वळतोय
अपघाताची चाहूल लागली असतानासुद्धा
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
पालथ्या घड्यावर पाणी ओततोय
पाणी वाया गेल्याचा पश्चात्ताप असतानासुद्धा
चालवतोय त्याच निसारड्या रस्त्यावरून गाडी
घसरून पडण्याचा अनुभव असतानासुद्धा
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
रंगवतोय तीच पात्रं वेगळ्या तऱ्हेने
गोष्टीचा शेवट तोच होणार असतानासुद्धा
धावतोय त्याच अंधाऱ्या बोगद्यातून
अंती प्रकाश नाहीये माहीत असतानासुद्धा
करतोय मी तीच चूक पुन्हा एकदा
भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतोय
स्वाभिमान विकतोय हे माहीत असतानासुद्धा
वेळेनुसार चेहरे बदलल्याने विश्वास ठेवतोय
मूळ स्वभाव बदलत नाही माहीत असतानासुद्धा
——————————————–
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा