तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

Photo by Yannic Läderach on Unsplash

——————————————-

इतिहासाच्या पानांवर उमटलेल्या ठशाप्रमाणे
वा भिंतीवर कोरलेल्या अभिलेखासारख्या
चिरकाल मनाच्या कोपऱ्यात रुजलेल्या
प्रेमपटलावरच्या रेषा पुसता पुसेना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

भिनलेली आहेस अशी नसानसांत तू
गेली आयुष्यातून तरी नसांतच राहिलीस
आठवणीरूपी जाणवणारे अस्तित्व तुझे
ही नसातली लाल शाई खोडता खोडेना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

सरली कितीतरी वर्षे आयुष्याची तरीही
छबी तुझी अजूनही तशीच आहे मनात
नेहमी भुलून टाकणारे ते स्मितहास्य
काही केल्या डोळ्यांसमोरून जाता जाईना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

कलियुगात त्रेतायुगातील प्रेम करणारा मी
विरहक्षणापासून तुझ्यासाठीच तडपतो आहे
माहीत आहे नाही शक्य प्रेमसेतू बांधणे पुन्हा
परंतु तू परतण्याची आशा सुटता सुटेना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

जातोय एकटाच त्या प्रत्येक ठिकाणी
आपण दुनियेपासून लपून भेटायचो जिथे
कारण आजही त्या अनमोल क्षणांचा ठेवा
भोळ्या हृदयातून काढता पाय घेता घेईना
तुझ्या नावाचं गोंदण मिटता मिटेना

——————————————-

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via