केलं मी त्या चंद्राला नजरेआड

Photo by Ryan Holloway on Unsplash

————————————————-

केलं मी त्या चंद्राला नजरेआड
होता जो समर्पणची व्याख्या माझी
होता जो श्वासांची माळ माझी
होता जो मनातली तळमळ माझी
होता जो प्रेमाची कळी माझी

केलं मी त्या चंद्राला नजरेआड
दुनिया नजरेआड केली ज्यासाठी
ज्याला पूर्ण दुनिया बनवली माझी
ज्याच्या विचारात गुंतलो सदा न् कदा
स्वत:पेक्षाही जास्त जपलं ज्याच्या जीवाला

केलं मी त्या चंद्राला नजरेआड
ज्याला प्रेम करणे कर्म आणि धर्म मानलं
ज्याच्या आनंदात स्वत:ला आनंदी मानलं
स्वत:ला विसरून पुरी केली इच्छा ज्याची
ज्याला ठेवलं प्रत्येक वेळी स्वत:आधी

केलं मी त्या चंद्राला नजरेआड
गमावून बसलो ज्यापायी मैत्री-नाती
जपले घट्ट नाते फक्त त्याच्याशीच
तरीही मीच पडायचो कमी कुठेतरी
दिसायचे माझेच काळे डाग दरवेळी

केलं मी त्या चंद्राला नजरेआड
घालून डोळ्यांवर काळ्या ढगांची झापडं
त्याचे अस्तित्वच नाकारण्याचे ठरवलं
ज्यासाठी राखून ठेवलं हृदयात अवघं आकाश
आता तिथे राहिलंय फक्त पोकळ अवकाश

————————————————-

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via