
Photo by Ben White on Unsplash
—————————————–
थिरकतात पाय घड्याळाच्या काट्यावर
चालत राहतो काट्याच्या दिशेने अखंड
घेऊन मुठीत स्वप्न जग फिरण्याची
बांधून फिरतो हथकडी जबाबदऱ्यांची
रीत ही होऊन बसली जगण्याची
बघत राहतो एकटक एका दिशेला
शोधत मागमूस सुप्त इच्छांचा
भंग करण्यास साधना येते अवचित
उंच लाट आशेच्या किरणांची
रीत ही होऊन बसली जगण्याची
सावलीने जरी ओळख दिली
नि:श्वास टाकेन समाधानाचा
चालत राहतो निरुद्देश उन्हात
नाही सवड उद्देश विचारण्याची
रीत ही होऊन बसली जगण्याची
पाहतो रोज आरशात स्व:ताला
धारण करून मुद्रा चैतन्याची
प्रतिबिंबही हसून विचारते परत
आहे का जाणीव या दिखाव्याची
रीत ही होऊन बसली जगण्याची
काय मिळवले तडजोड करून
मागील वर्षीही हेच सर्व केले
दिवस मोजण्यास हे मजबुरीचे
नाही मिळत पारडी मोजमापाची
रीत ही होऊन बसली जगण्याची
—————————————–
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा