असतेस तू जवळ जेव्हा

असतेस तू जवळ जेव्हा
एक आनंद असतो मनात
एक हर्ष-उल्हास जगतो उरात
एक गीत झळकते ओठांत
एक दिलासा येतो काळजात

असतेस तू जवळ जेव्हा
बोलावेसे जरी काही नसले
तरी तू जवळ असावी वाटते
बघून तुला डोळे भरून
डोळ्यात साठवावेसे वाटते

असतेस तू जवळ जेव्हा
निशब्द राहून सुख मिळते असे
सूर्योदयाआधी पहाटेचे वातावरण जसे
बोलण्यात तुझ्या गुंग होऊन जातो असे
घुंगराच्या नादात हरवून जावे जसे

असतेस तू जवळ जेव्हा
चढते मनावर एक सुंदर शाल अशी
पांघरावी डोंगरांनी धुक्याची चादर जशी
उजळते अंधाऱ्या जीवनाची अमावस्या अशी
चांदण्यांनी अवकाशात आरास मांडली जशी

असतेस तू जवळ जेव्हा
चमकू लागतात डोळे असे
आनंदोत्सवाचे साक्षीदार आहेत जसे
विचार भटके तुझ्यावर येऊन थांबतात
पूर्णवेळ तुलाच शोधत होते जसे

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via