आठवणींचे दवबिंदू

Photo by Harli Marten on Unsplash

———————————————–

अवकाळी पावसासारखं तू कधी मनात यावं
रोजचं गतिमान जीवन विस्कळीत व्हावं
काही वेळ तुझ्या विचारांत घालवून
ओलावल्या पापण्यांनी तुझ्यात मिसळून जावं

नाही गेलो जरी आयुष्याच्या पुढील टप्प्यात
नसेल पर्वा काही जर बिघडलं माझं
पण जर समर्पणातलं सुख नाही कळलं
तर नक्कीच काहीतरी राहून जाईल माझं

चारही दिशांना गारवा पसरल्यासारख्या
वेदना अंतरीच्या स्पर्श करून जाव्यात
जरा चुकल्या चुकल्यासारखं वाटून
थंडीतही विराहाच्या झळा बसाव्यात

रात्रीसोबत सरत सरत पहाटेकडे
देहभान हरपून फक्त तुझे नाव घ्यावे
उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने ओंजळीत
तुझ्या आठवणींचे दवबिंदू साठवावे

———————————————–

शेअर करा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via