वाहते पाणी उतारावरून जसे
आठवणीत तुझ्या वाहतो तसा
हसतो गालातल्या गालातच मी
उगाच आनंदी राहतो मी असा
गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा
फुलताच प्रेमाच्या बागा मनात
टाकल्या जबाबदऱ्या झटकून
तमाही ना बाळगली बंधनांची
मृद्गंधासम दरवळलो कसा
गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा
झुळूकेने होई स्पर्श शरीराला
तुझ्या आभासाने शहारतो तसा
स्पंदने घाली साद तुझ्या नावाची
घातला घाट खुळेपणाचा असा
गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा
स्वस्थ न बसू देते काहूर
पाहण्यास तुला लागे हुरहूर
भरताना रंग तुझा नजरेत
इंद्रधनूही फिका वाटतो कसा
गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा
विचारांत तुझ्या रमत गमत
कडूलिंबाचा पालाही लागे गोड
प्रेमात दुनियादारी विसरून
बेफिकीर, बेभान होतो मी असा
गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा