
Photo by Adam Dutton on Unsplash
———————————–
परतीच्या पावसाकडे धाडला सांगावा
पाखराला घरट्याची आठवण करण्याचा
सांजवेळी निळ्या आकाशी वाट पाहताना
काही सत्य किती भयाण असू शकतात
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला
काय हट्ट करावा विझलेल्या पणत्यांकडे
प्रकाशाचे वचन नाही देऊ शकत त्या
नसते मागायचे स्पष्टीकरण त्या लोकांना
मातीचे मोल आहोत नजरेत ज्यांच्या
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला
काय रोखावे त्या निखळत्या झऱ्याला
उतारावरून मार्गक्रमण केले ज्याने
फोल ठरते इच्छा आणि धडपडही
वाऱ्याला मुठीत कैद करण्याची
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला
तुटलेले बंधही जोडले जातील
सुटलेली गाठही बांधली जाईल
पण नाही राहणार कदर तुमची
झाल्यावर साध्य स्वार्थी हेतू
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला
उगवतो का कधी सूर्य पश्चिमेला
दिसते का कधी चंद्रकोर अमावास्येला
सोडून गेले जे क्षणाचा विचार न करता
त्यांना परतीचा मार्ग कधी गवसेल का
त्या निळ्या सांजप्रहरी उमगले मला
————————————
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा