पाहिला असा मी सोहळा वारीचा

निघाले नयन घेऊनी ध्यास
विटेवरी उभ्या सुंदर देवतेचा
इंद्रधनूलाही न आवरला मोह
तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा

दुमदुमला एकच नाद चराचरात
टाळ–मृदुंग-ढोलकी घेऊनी साथीस
वैष्णव नाचे होऊनी तल्लीन
करीत गजर विठ्ठल नामाचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा

एकामागून एक दिंडी चाले
दृष्टिपलीकडीलही सृष्टी व्यापत
डोकी तुळस मस्तकी टिळा वाहत
पाऊलागणिक घेती वेध पंढरीचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा

असेल गावी राव वा रंक
होता वारीत वारकरीच तो
रंगात रंगुनी हरीभक्तीच्या
होता उधळत रंग एकीचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा

मनी न लालसा ना कोणता स्वार्थ
काही श्वास करुनी विठोबास अर्पण
नामस्मरणात त्याच्या देहभान विसरून
घातला घाट सार्थकी आयुष्याचा
पाहिला असा मी सोहळा वारीचा

 

शेअर करा 

तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा

Share via