
Photo by Sandip Karangiya on Unsplash
—————————————-
बेफिकीर होऊन हसताना
पडले तिचे हसू जर मातीत
हास्याचा अंश न् अंश वेचून
ते परत तिच्या ओठी ठेवेल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
प्रेमाची आर्त साद घालताना
हरवला तिचा आवाज आसमंतात
आवाजातला सूर न् सूर शोधून
तो परत तिच्या कंठी ठेवेल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
एकटक त्याला न्याहाळताना
नाही राहिले जर भान वास्तवाचे
बेभान ती नजर न् नजर साठवून
तो परत तिच्या डोळी ठेवेल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
दूरदेशी बासरी वाजवताना
विरून टाकले जर स्वर वाऱ्याने
मधुर तो स्वर न् स्वर गोळा करून
तो परत तिच्या कानी ठेवेल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
चुलीवर पंचपक्वान्न शिजवताना
जळविले ते स्वत: ज्वालेने धग वाढवून
स्वादिष्ट तो कण न् कण समजून
तो परत तिच्या पोटी जाईल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
जगले आयुष्य ज्या प्रेमाची वाट पाहताना
मागच्या जन्मीच्या पुण्याचे संचित समजून
मिलनाचा तो क्षण न् क्षण एकवटून
ते प्रेम तिच्या नशिबी ठेवेल ना
सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी
कान्हा मीरेचा होईल ना?
—————————————-
तुमचे मत/प्रतिक्रिया जरूर मांडा